• Home
  • Blogs
  • Marathi"करोना - जनपदोध्वंस -आयुर्वेद "

"करोना - जनपदोध्वंस -आयुर्वेद "

User

By NS Desk | 14-Mar-2020

corona

वैद्य परीक्षित स. शेवडे, एम.डी. (आयुर्वेद)

आयुर्वेदात 'करोना'चा उल्लेख आहे का? आमच्या पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला. आजवर अशा  प्रश्नांची सवय झाल्याने त्यांना म्हटलं; "हो. आहे." 

"काहीतरी काय सांगताय? तेव्हा करोनाचा शोध लागला होता का?"

"नव्हता. तुम्हालाही माहिती असून हा प्रश्न विचारला ना? तरीही सांगतो. नाव माहिती नसलं तरी उपाय माहिती होते. मार्गदर्शक तत्व सांगितली होती." 

चरक संहितेत 'जनपदोध्वंसनीय विमान' नावाचा अध्याय आला आहे. 'जनपदोध्वंस' म्हणजे आजच्या वैद्यकाच्या दृष्टीने Epidemic. करोना हा त्याचेच एक रूप. आता हा जनपदोध्वंस का होतो? तर दूषित वायू, जल, देश आणि काल यांमुळे. यांची मारकता उत्तरोत्तर अधिक सांगितली आहे. थोडक्यात 'काळ' आला असला तर कोणाचाही इलाज नाही! मग या व्याधींवर इलाज काय? सगळ्यात आधी यांचं कारण शोधून काढायला हवं. आयुर्वेद म्हणतो; 'अधर्माचरण' हे या रोगांचं कारण आहे. कसं बरं? दिनचर्या-ऋतुचर्या न पाळणं, प्रदूषण इथपासून ते रक्तपिपासूपणा, युद्धजन्य स्थिती, हरवत चाललेली माणुसकी हे सारं अधर्माचरणच नाही का? 

वाग्भट सांगतात;
नीचरोमनखश्मश्रुर्निर्मलाङ्घ्रिमलायनः ।
स्नानशीलः सुसुरभिः सुवेषो अनुल्बणोज्ज्वलः।।

- शरीरावरील केस, नख, दाढी यांचे नियमित कर्तन करावे, गुदद्वारादि ठिकाणे स्वच्छ असावीत, नियमित स्नान आणि सुगंधधारण करावे. 

नासंवृतमुखः कुर्यात्क्षुतिहास्यविज्रुम्भणम्।

- तोंडाला न झाकता शिंकणे, हसणे व जांभया देणे टाळावे. 

नासिकां न विकुष्णीयात्।

- नाक कोरु नये.

करोना येइपर्यंत आपण या गोष्टींना किती गांभीर्यानं घेतलं? 'प्रतिबंध हा उपचारापेक्षा महत्वाचा' ही शिकवण जगाला सर्वप्रथम देणाऱ्या आयुर्वेदाची आपणच उपेक्षा केली. आता मात्र जगाला आयुर्वेद प्रकर्षाने आठवतोय. 'जनपदोध्वंस' समयी काय प्रतिबंध करावा; याला जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीस आयुर्वेदाचा आधार देत खालील गोष्टी आपण करू शकता; 

१. कामासाठी बाहेर निघताना दोन्ही नाकपुड्यांत कोमट केलेल्या देशी गायीच्या साजूक तुपाचे २-२ थेंब टाकणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

२. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे. 

३. कामावरून घरी आल्यावर कडकडीत पाण्याने अंघोळ करणे. 

४. घरामध्ये कडुनिंब, धूप, देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर असा धूप घालणे. (खोकला येत असणाऱ्या व्यक्तींपासून दूर ठेवावे.)

५. आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास रुमालाचा वापर करणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींशी बोलताना जास्त जवळ न जाणे. 

६. सकाळच्या वेळी कपभर देशी गायीच्या गरम दुधात हळद आणि सुंठ घालून पिणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

७. 'मला एक बाईट/सिप दे ना' म्हणत म्हणत इतरांचे उष्टे खाणे, चहा इत्यादि पिणे सक्तीने टाळावे. 

८. भाज्या आणि फळे व्यवस्थित धुवून मगच वापरावी. बाहेर मिळणारे सॅलड्स, सँडविच, फ्रुट डिश इत्यादि पदार्थ टाळावे.

९. नाक, तोंड आणि डोळे यांना शक्यतो हाताने स्पर्श करू नये. करायचा झाल्यास हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करावी. 

१०. सध्या काहीकाळ तरी सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्या वैद्यांना त्वरित भेटणे. 

आयुर्वेद सांगतो; जनपदोध्वंसापूर्वीच औषधींचा संग्रह वैद्यांनी करून ठेवावा. निसर्गाशी जवळीक साधली की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. देशी गायींबाबत काम करत असल्याने अशा संकटाची थोडीशी चाहूल लागली होती. वर दिलेल्या दहा टिप्स मी सोशल मीडियावर २५ जानेवारी रोजी शेयर केल्या होत्या. त्यावेळेस त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत; कारण भारतात करोनाचा प्रवेश होईल असं कोणालाही वाटत नसावं! 

जनपदोध्वंसावर काही उपाय आहे का? चरक सांगतात; अर्हता पाहून पंचकर्म देणे आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेत राहणे हा उत्तम उपाय आहे. 'च्यवनप्राश दीर्घकाळ सेवन करण्याची गोष्ट आहे; महिनाभरापुरती बाब नाही.' अशीही पोस्ट च्यवनप्राश बनवला होता तेव्हा केली होती. आज त्यांचंही महत्व आपल्याला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधर्माचरण सोडायला हवं. फार खोलात जाऊ नका; किमान आपल्या वैद्यांना भेटून आयुर्वेदाला अपेक्षित दिनचर्या-ऋतुचर्या जाणून घ्या आणि आचरणात आणायला सुरुवात करा. जगभरात संशोधन करून आज हे सांगितलं जात आहे की प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाची मारकता घटेल. आयुर्वेद हे कित्येक शतकं सांगतोय. आज हळदीची मागणी वाढते आहे. यावर्षीची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. जग आयुर्वेदाकडे आशेने बघतंय. आपण करंटेपणा कधी सोडणार? आयुर्वेद ही आपली जीवनशैली आणि पहिली चिकित्सापद्धती बनवा. वैद्य बांधवांनीदेखील 'करोना काय करणार?' हा निष्काळजी पवित्रा ते 'करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?' हा नकारात्मक पवित्रा सोडायला हवा. हीच वेळ आहे घराघरांत आयुर्वेद नेण्याची. चला; या जनपदोध्वंसावरून तरी काही बोध घेऊया!

© वैद्य परीक्षित स. शेवडे, एम.डी. (आयुर्वेद)

।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
डोंबिवली आणि मडगाव (गोवा) 

अपॉईंटमेंटसाठी संपर्क:
8452007020 / 0251-2863835

डिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें।